महिलांना निर्भय बनविण्यासाठी...
महिलांना निर्भय बनविण्यासाठी..महिलांवरील अत्याचार, लैगिंक छळ, छेडछाड, महिलांविषयक गुन्हे नियंत्रित करणे आणि गुन्हेगारांची मानसिकता बदलणे हे आजच्या घडीला पोलिसांसमोरील मोठं आव्हान आहे. तेलंगणा राज्य पोलिसांच्या "SHE TEAM" च्या धर्तीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी महिला सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची दिनांक 8 ऑगस्ट 2016 रोजी स्थापना केली आहे. निर्भया पथकाच्या स्थापनेमुळे कोल्हापूर परिक्षेत्रात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
महिलांची छेडछाड हा माहिलांवरील अत्याचारातील अगदी पहिला टप्पा आहे. फोन कॉल, मेसेज, ई-मेल, सोशल मीडियाचा वापर करुन किंवा प्रत्यक्षरित्या महिलेची छेड काढली जाते, अशा वेळी महिलांना विनाविलंब पोलिसांची मदत उपलब्ध करून देऊन तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, महिला/ शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे होणारे दुर्लक्ष व त्यातून अपराध्यांचे वाढणारे बळ यांवर प्रभावी नियंत्रण आणणे, पुरुषांना विशेषत: तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाची समुपदेशनातून जाणीव करून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने त्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर परिक्षेत्रात विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व पुणे या जिल्ह्यात निर्भया पथकाच्या माध्यमातून काम सुरु आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचे काम चालते. प्रत्येक जिल्ह्यात पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यावर पोलीस उपअधीक्षक यांचे नियंत्रण आहे.
निर्भया पथकात प्रत्येक टीममध्ये सहायक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला अधिकारी असते. त्यांना मदत करण्यासाठी दोन महिला पोलीस हवालदार आणि दोन पुरुष पोलीस हवालदार असतात. त्यांची नेमणूक तीन महिन्याकरीता असते. निर्भया पथकातील टीमचे अस्तित्व नागरिकांकरीता गोपनीय ठेवण्याकरीता ही टीम खाजगी वेशात वावरते. आरोपीवर वस्तुनिष्ठ नियंत्रण ठेवण्यासाठी टीम सोबत स्पाय कॅमेराही असतो.
निर्भया पथकातील टीमला जिल्हास्तरावर किमान तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणामध्ये महिलांचे समाजातील स्थान, त्यांच्यावरील अत्याचार वा छेडछाड, त्यातून त्यांच्यावर होणारे शारीरिक, मानसिक आघात व त्यांवर उपचार तसेच महिलांबाबत कायदेशीर तरतूदींचे सखोल मार्गदर्शन दिले जाते.
या पथकाच्यावतीने पहिल्यांदा महिला अथवा तरुणींची छेडछाड होण्याची शक्यता असणारी ठिकाणे शोधून काढण्यात येतात. त्यामध्ये शाळा, महाविद्यालये, बस स्थानक, बाजारपेठा, महिला वसतीगृहे, सिनेमा हॉल, उद्याने इत्यादीचा समावेश असतो. निर्भया पथक अशा ठिकाणांची टेहाळणी करुन उडाणटप्पू मुले, तरुण, पुरुषांचा शोध घेते.
टीम सोबत असलेल्या स्पाय कॅमेरा, स्मार्टफोनचा कॅमेरा किंवा छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांच्या छेडछाडीच्या संशयास्पद हालचालीचे चित्रीकरण केले जाते. चित्रीकरणाच्या आधारे सदर संशयिताला ताब्यात घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला नेण्यात येते. गुन्हा घडते वेळी हजर साक्षीदार सामाजिक जबाबदारीतून स्वतःहून तपासाच्या प्रक्रियेत सहभागी होत असल्यास त्यांची साक्ष नोंदविली जाते.
संबंधितांने केलेल्या कृत्याचे स्वरूप लक्षात घेता त्यानुसार उचित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येतो. पोलीस आवश्यकतेनुसार न्यायालयात दोषारोपपत्र सादर करतात किंवा अल्पवयीन अपराध्याला समज देवून पालकांच्या ताब्यात दिले जाते. अपराध्याचे छायाचित्र व अंगुली मुद्रा व त्याची सविस्तर माहिती घेतली जाते. तसेच त्याने केलेल्या कृत्याची माहिती त्याची आई वा पत्नीला दिली जाते.
आरोपी वर गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित आरोपींचे समुपदेशन केले जाते. समुपदेशन करतांना विवाहित पुरुष अपराध्यासोबत त्याची पत्नी वा मुलगी तसेच अल्पवयीन/ अविवाहित अपराध्यासोबत त्याचे आई, वडील व बहीण समुपदेशनाकरिता हजर असणे बंधनकारक आहे. यावेळी पीडित व आरोपी या दोहोंचे समुपदेशन केले जाते. घडलेल्या घटनेचे परिणाम गंभीर होऊ नयेत वा त्याची व्याप्ती वाढू नये, यासाठी त्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्याकरीता समुपदेशन करण्यात येते. आठवड्यातील सर्व घटनांबाबत दर शनिवारी एकत्रित समुपदेशन सत्र आयोजित करण्यात येते. तज्ज्ञ समुपदेशक, स्त्रीरोग तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, पोलीस अधिकारी, वकील व मानसोपचार तज्ज्ञ यांच्यामार्फत संबंधित तरुण -तरुणींना समुपदेशन केले जाते.
महिला व तरुणींना त्यांच्या सुरक्षितता व कायदेशीर हक्कांबाबत जाणीव करुन देणे व पुरुषांना त्यांचे कृत्य अपराध असल्याबाबत व त्याचे परिणाम, शिक्षा याचे मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून समाजात निर्भया पथकामार्फत प्रबोधनात्मक शिबीरे आयोजित केली जात आहेत. यासाठी मार्गदर्शन शिबीरे, पोस्टर्स, वेब साईट, रेडियोवरील महिलांविषयक/ तरुणांचे कार्यक्रम, स्टीकर्स, शॉर्ट फिल्म्स, थिएटर मध्ये सिनेमा मध्यंतरावेळी जाहिरातीद्वारे प्रबोधन केले जात आहे.
निर्भया पथकास संपर्क साधण्यासाठी महिला 100 किंवा 1091 या टोल फ्री क्रमाकांचा वापर करु शकतात. व्हॉट्स ॲप अथवा Pratisad App बरोबरच ई-मेल, फेसबुक या सोशल मीडियावरुनही पोलिसांशी संपर्क साधता येईल. तसेच पोस्टकार्ड व पत्राद्वारेही जवळच्या पोलीस स्थानकास कळवू शकतात.
कोल्हापूर परिक्षेत्रात निर्भया पथकाच्यावतीने घेण्यात येणारी मार्गदर्शनपर शिबिरं आणि समुपदेशनामुळं महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्या निर्भय होण्याबरोबरच तरुणांची मानसिकता बदलण्यास मदत होत आहे.
लेखक - वृषाली मिलिंद पाटील
सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, पुणे.
स्त्रोत - महान्युज
No comments:
Post a Comment